औरंगाबादकरांनो 31st साजरा करताय ? इकडे लक्ष द्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई सुद्धा होऊ शकते !

Foto

औरंगाबाद- मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज सर्वजण तयार झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमिताने शहरासह अनेक ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुष्काळ, वाढती थंडी  असली तरी नववर्षाचे जल्‍लोषात स्वागत करण्याची तयारी अनेकांनी केली आहे. नववर्षाच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी शहरभर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्य प्राशन करून बेफाम वाहने चालविणार्‍यांवर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण 65 महत्त्वाच्या ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’ लावून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.

 

आज 31 डिसेंबर, वर्षातील शेवटचा दिवस. 2018 या वर्षाला निरोप देत 2019 चे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी जोरदार तयारी केली आहे.  हॉटेल्स, ढाब्यांवर जाऊन पार्ट्या करण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. नववर्षाच्या स्वागतानिमित्त अनेकांनी धार्मिक स्थळ, पर्यटनस्थळांची सैर करण्याचे नियोजन केले असून, दौलताबाद, वेरूळ, अजिंठा, शूलिभंजन, म्हैसमाळ आदी ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईने वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य, गाण्यांवर धमाल करण्याचे नियोजन केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल्स व ढाबेचालकांकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणार्‍यांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे काही नागरिकांनी घरातच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे ठरवले आहे.



थर्टी फर्स्ट’निमित्त शहर व ग्रामीण भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नववर्षाच्या जल्‍लोषाला गालबोट लागू नये, यासाठी शहर पोलिस दलाने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. 3 पोलिस उपायुक्‍त, 8 सहाय्यक पोलिस आयुक्‍त, 34 पोलिस निरीक्षक, 2500 पोलिस कर्मचारी व विशेष पोलिस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या जल्‍लोषात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. काही उत्साही तरुण मद्य प्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यांच्यावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथके नेमण्यात आली आहेत. हर्सूल टी पाईंट, जालना रोडवर केंब्रिज स्कूल चौक, झाल्टा फाटा, पैठण रोड, दौलताबाद टी-पॉईंट, वाळूज आदी ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. त्या चेक पोस्टवर एक पोलिस उपनिरीक्षक व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 65 ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’ लावले आहेत. त्या ठिकाणीदेखील एक पोलिस उपनिरीक्षक व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच शहरात पेट्रोलिंगसाठी 8 विशेष पेट्रोलिंग मोबाईल नेमण्यात आल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकात रहदारी नियमनासाठी वाहतूक शाखेचा एक अधिकारी व पाच कर्मचारी नेमले आहेत. गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार केले असून, प्रत्येक पथकात एक पोलिस उपनिरीक्षक व 5 कर्मचारी राहतील. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर दारू विकणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक पथक नियुक्‍त केले आहे. एखाद्या ठिकाणी अनुचित घटना घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी जाण्यासाठी टु मोबाईल व चार्ली पथक नेमण्यात आले आहे.



...तर कडक कारवाई करू -चिरंजीव प्रसाद



रात्री मद्यपी तसेच इतर काही उत्साही मंडळी सुसाट वेगाने वाहने चालवतात. या काळात कोणी कायद्याचे उल्‍लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी उत्साहात नववर्षाचे स्वागत करावे;परंतु आपल्या कृत्यामुळे आपला व इतरांचा जीव धोक्यात येणार नाही तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.

 


चिकन, मटनला मागणी वाढली



 ‘थर्टी फर्स्ट’निमित्त चिकन आणि मटणला आज खवय्यांकडून अधिक मागणी होत असते. त्यामुळे लहान-मोठ्या हॉटेलांपासून ढाब्यांवर खवय्यांची मोठी गर्दी होते. ‘थर्टी फर्स्ट’निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात चिकन, मटन दाखल झाले आहे. आज शहरात ब्रॉयलर चिकन 160 रुपये तर मटण 450 रुपये किलो दराने विकले गेले. गावठी कोंबड्यांचा पुरवठा कमी झाला असल्यामुळे 300 रुपये किलोने विकली जाणार्‍या गावठी कोंबडीची किंमत 650 रुपयांवर पोहोचली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

 

 

वाईन शॉप मध्यरात्री एकपर्यंत तर बीअर बार, परमीट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू


आज थंडीचा कडाका असला तरी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करत सरत्या वर्षाला निरोप देऊन मध्यरात्री नववर्षाचे स्वागत केले जाईल. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने शहरातील वाईन शॉप, देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आज मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर बीअर बार, परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.